विदर्भातील महत्वाचा जिल्हा बुलढाणा असून सदर जिल्हयात एकूण 13 तालूके आहेत. बुलढाणा जिल्हयाची एकूण लोकसंख्या 25,86,258 असून जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९,६६१ चौ. किमी आहे.

बुलढाणा या शहराचे पूर्वीचे नाव 'भिलठाणा' असे होते. त्याचे इंग्रज काळात 'बुलढाणा' असे नामांतर करण्यात आले. हे एक थंड हवेचे ठिकाण होते. आजही विदर्भात सर्वात कमी तापमान बुलढाणा शहराचे असते.

लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे.याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली.लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे.

बुलडाणा शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. १. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३अ मलकापूर - बुलडाणा -जालना- संभाजीनगर आणि २. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ई अजिंठा-बुलडाणा-खामगाव जातो जो खामगावहुन पुढे अचलपूर मार्गे मध्य प्रदेशातील बैतुल शहरास जातो.

बुलढाणा शहरात तिरुपतीच्या धर्तीवर मलकापूर-बुलडाणा राष्ट्रीय महामार्गावर राजूर घाटात टेकडीवर श्री भगवान बालाजी यांचे नयनरम्य असे मंदिर बांधण्यात आले आहे. जे आज एक प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळ आहे.

श्री गजानन महाराजांचे समाधी मंदिर हे बुलढाणा जिल्ह्यात शेगाव या गावी आहे . मंदिराजवळ आनंद सागर हे रमणीय ठिकाण आहे.